भेगा महाग पडतात
चिरलेल्या मातीच्या रेघा ..महाग पडतात
कुणाचाही असो झेंडा..हातात..
त्या हातावर सुकलेले भविष्य
सुरकूतलेले हसू.. फाटलेल्या ओठावरचे
डांबरी रस्त्यावरील अनवाणी पाय..
कपाळात टोचणारे चांभारी खिळे..
फाटक्या सदऱ्यावाला बाप..उघड्या पाठीचा
तुमच्या दरी येऊन जेव्हा भीक मांगतो
आपल्या पोरांसाठी,वाळक्या ढोरासाठी
पोसणाऱ्या मायेनं, पुन्हा उजवाव म्हणून
पाणी मागतो,आशेचं ,गढूळ का होईना
तेच्यावर तुमचा बिसलेरी,आरओ..महाग पडतो
गालावर सुकेलेल्या असवाचे थेंब..
नजरेत मेलेले कोंब..
तुम्ही कीतीही प्याकेट दिले अन्नाचे तरी..
देणाऱ्या हाती,घेन्याचे दैव..
एकटेपणाची झोम्ब.. भुकेल्या पोटी..लै महाग पडते
महाग पडते ही निवडणूक..मतांची नाही
प्रेतांची..माणसाच्या हिमतींची..
खंद्यायवर वाहलेली..हजारो माढ्यांची जत्रा..
तुमच्या लोकलच्या बाजूने जाणारी ही लोकं
लुगड्याला पडलेली ही भोकं..
रस्त्यावर उतरलेली माही माय..महाग पडते..
खूप महाग पडते…
रस्त्यावर उतरलेली माही बुढी माय..